गोरगरिबांना आधार देण्याची गोपीनाथ मुंडेंची शिकवण : धीरज घाटे

81

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना एक लाखाची शिष्यवृत्ती

पुणे : “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी कष्टकरी, ऊसतोड कामगार आणि वंचित घटकांतील लोकांना सन्मान दिला. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला घडविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्याकडे पाहूनच माझा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे माझी जडणघडण झाली,” अशी भावना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस नगरसेवक धीरज घाटे यांनी व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त साने गुरुजी तरुण मंडळ, भारतीय जनता पार्टी आणि हिंदूगर्जना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात घाटे बोलत होते. पुणे विद्यार्थी गृह येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मिलिंद वेर्लेकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह राजेंद्र कांबळे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, नगरसेवक रघुनाथ गौडा, नगरसेविका स्मिता वस्ते, सरस्वतीताई शेंडगे, माजी नगरसेविका मनिषा घाटे, राजाभाऊ शेंडगे, आशिष चांदोरकर, राजेंद्र फाटे, ओंकार कुलकर्णी, अमर आवळे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि साने गुरुजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक२९ आणि कसबा मतदारसंघातील सजग नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी धीरज घाटे यांच्यातर्फे पुणे विद्यार्थी गृहामधील वीस विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलली असून, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी एक लाख रुपयांचा निधी प्रदान केला. यामध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी येथील गरीब आणि गरजू, ऊसतोड कामगारांची आणि अनाथ मुले आहेत. या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, जीवनोपयोगी वस्तू आणि थंडीपासून बचाव करण्यासाठीचे साहित्य वितरित करण्यात आले. तसेच घाटे यांनी ११ हजार, तर आनंद पाटील आणि भूषण पासलकर यांनी १० हजारांची देणगी पुणे विद्यार्थी गृहाला दिली.

मिलिंद वेर्लेकर, राजेंद्र कांबळे, रघुनाथ गौडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. सचिन जायभाये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले. आभार मनीषा घाटे यांनी मानले. कार्यक्रमानंतर संस्थेतील विद्यार्थी व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.