दुचाकीचे महागडे पार्ट चोरणारी टोळी गजाआड

85

खालुंब्रे हद्दीतील ऑटोकॉम कंपनीतील प्रकारदोघेजण पाच महिन्यांनी जेरबंदतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकण : पाच महिन्यांपूर्वी चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खालुंब्रे ( ता. खेड ) गावच्या हद्द्दीतील ऑटोकॉम कॉर्पोरेशन पानसे प्रा. लिमिटेड या कंपनीच्या गोदामामधून चोवीस लाख रुपयांचे मोटार सायकलीचे महागडे पार्ट चोरून पोबारा केलेल्या दोघांना तब्बल पाच महिन्यांनी जेरबंद करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या त्या दोघांकडून चोवीस लाखांपैकी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिलिंद संपतराव चव्हाण व राजेंद्र पांडुरंग डवले ( पूर्ण नाव, गाव व पत्ता समजला नाही.) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ऑटोकॉम पानसे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नित्यानंद बाळकृष्ण पानसे ( रा. आय.टी.आय.रोड, औंध, पुणे ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खालुंब्रे ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील प्लॉट नं. ए. २१/१,  एम.आय.डी.सी. फेज २ मध्ये ऑटोकॉम कॉर्पोरेशन पानसे प्रा. ली. या नावाची कंपनी आहे. या कंपनीतून वरील दोघांनी संगनमताने २४ जून ते २२ जुलै या एक महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या उघड्या शटरमधून आत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी २३ लाख, ९९ हजार २७३ रुपयांचे विविध प्रकारचे मोटार सायकलींचे महागडे पार्ट चोरून नेले होते.

याबाबतची माहिती चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांना त्यांच्या एका गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यामुळे येथील पोलिसांनी याबाबत अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. चव्हाण व डवले हे याच कंपनी मध्ये तीन महिने सुरक्षारक्षक म्हणून कामावर होते. त्यांनीच सदरची चोरी केली असल्याचे समजल्या नंतर त्यांना महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील एच.पी. चौकात सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असता त्यांच्याकडून पोलिसांनी मोटार सायकलींच्या वायरिंग व शॉकऑबझर असा एकुण २ लाख, ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरील दोन्ही चोरट्यांनी या चोरीत त्यांच्या आणखी साथीदारांची नावे सांगितली असून, त्यांच्या शोधासाठी येथील पोलिसांची पथके सर्वत्र रवाना करण्यात आली आहेत.

पोलीस आयुक्त आर.के. पदमनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस निरीक्षक सुनिल दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, संजय निलपत्रेवार, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, पप्पू उर्फ सुरेश हिंगे, पोलीस नाईक संपत मुळे, प्रदीप राळे, अनिल गोरड, प्रशांत वहिल आदिंनी वरील टोळीला गजाआड करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.