आजारांना दूर ठेवण्यासाठी लठ्ठपणा कमी करावा : मेधा कुलकर्णी

153

‘वाईब्स पुणे’तर्फे लठ्ठपणाविरोधी जागृती रॅली

पुणे : “बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. परिणामी, मधुमेह, रक्तदाब आणि इतर गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा  आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन लठ्ठपणा कमी राहील, यासाठी आपण प्रयत्न करावेत,” असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त पुण्यातील वाईब्स या संस्थेच्या वतीने लठ्ठपणाबाबत जागृती करण्यासाठी रविवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी उद्घाटन करताना मेधा कुलकर्णी बोलत होत्या. ‘वाईब्स’च्या पश्चिम विभागीय प्रमुख सोनिया कुमार, वैशाली दवे आदी उपस्थित होते. वाईब्सच्या कल्याणीनगर शाखेच्या वतीनेही रॅली काढण्यात आली. माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

भांडारकर रस्त्यावरील वाईब्सच्या कार्यालयापासून ही रॅली निघाली. गुडलक चौक, गोखले रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालयात, तुकाराम पादुका चौक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, गुडलक चौक ते वाईब्ज कार्यालय अशी ही रॅली झाली. ‘व्यायाम करा, लठ्ठपणा दूर ठेवा’, ‘लठ्ठपणा हटवा, निरोगी रहा’ अशा घोषणा देत जागृती करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोनिया कुमार म्हणाल्या, “लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, ते थांबवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणा कमी करावा लागेल.”