नवाजुद्दीनही अडकला “मी टू’च्या जाळ्यात

24

माजी मिस इंडियाकडून गंभीर आरोप 

मुंबई  – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता मीटूच्या जाळ्यात अडकला आहे. माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री निहारिका सिंह हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार संध्या मेनन हिने ट्विटरवर एकापाठोपाठ एक असे ट्विट्‌स करत निहारिकाची करुण कथा जगासमोर मांडली आहे.

निहारिका आणि नवाज “मिस लवली’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. निहारिकाने म्हटले आहे की, माझ्या घराजवळच एके दिवशी नवाजुद्दीन सिद्दिकीच्या चित्रपटाचे रात्रभर शुटिंग सुरु होते. त्यावेळी मी नवाजला सकाळी घरी नाश्‍त्यासाठी बोलावले. नवाज सकाळी घरी आला आणि मी दरवाजा उघडताच त्याने मला मिठित घट्ट पकडले. मी त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरुवातीला मला ते शक्‍य झाले नाही. त्यानंतर काही वेळ आमच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर मी त्याच्या मिठीतून सुटले.

त्यावेळी मला काय करावे हे कळत नव्हते. नवाज मला म्हणाला, माझे स्वप्न आहे की, परेश रावल आणि मनोज वाजपेयी यांच्याप्रमाणे माझी बायकोसुद्धा मिस इंडिया किंवा मोठी बॉलिवूड अभिनेत्री असावी. त्यानंतर मला एकापाठोपाठ एक अशी नवाजची वेगवेगळी रूपे समोर येऊ लागली. त्यानंतर मी नवाजसोबतचे माझे सर्व संबंध तोडून टाकले.