‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… पुणे विद्यापीठातील प्रकार

पुणे : पुण्यात “लव्ह जिहाद” चा आरोप करून तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्य धर्मातील तरुणीशी केलेली मैत्री त्याने तोडावी म्हणून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणातील संबंधित तरुण आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपहारगृहातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने विद्यार्थ्याला अडवले. विद्यार्थी आणि त्याच्या मैत्रिणीकडे त्यांनी आधारकार्ड मागितले. दोघांच्या धर्मांबाबत त्यांनी विचारणा केली. त्यानंतर तू लव्ह जिहाद करतोस का?, असा तरुणावर आरोप करून, कार्यकर्त्यांनी तरुणीला बाजूला नेले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

तरुण विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी आहे. तरुण आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपहारगृहातून निघाले. त्यानंतर काही जण टू व्हिलरवरुन आले आणि दोघांना अडवलं आणि आम्ही हिंदु संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं त्यांनी सांगितलं. या नंतर तरुणाला मारहाण केली आणि तरुणीला बाजूला घेऊन तिला लव्ह जिहाद संदर्भात माहिती दिली. तरुणाच्या पालकांना फोन करुन मुलाला घेऊन जा नाहीतर… , अशी धमकी दिली. या प्रकरणी आता पुढील चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणी तरुणाने वसतीगृह प्रमुखाकडे तक्रार केली. त्यात कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचं नमूद केलं आहे. ‘मला धमकावून वसतिगृहावर नेले. कपडे भरून निघून जा. परत येथे दिसता कामा नये’, अशी धमकी दिल्याचं तरुणाने तक्रारीत नमूद केलं आहे.

विद्यापीठाकडून चौकशी केली जाणार

विद्यापीठाकडे या प्रकरणाची तक्रार गेली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.