ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत शैक्षणिक सहल

पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च महाविद्यालयातर्फे पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या नेतृत्वात २ ते ६ एप्रिल २०२४ दरम्यान बँकॉक, थायलंड येथे ही सहल आयोजिली होती. प्रत्येक विभागातील एक विद्यार्थी व एक प्राध्यापक यामध्ये सहभागी झाले होते. प्राध्यापकांमधून डॉ. शरद कांदे. डॉ. विलास गायकवाड, प्रा. प्रमिला भागवत, प्रा. मोनिका समरूतवार, प्रा. संतोष डोईफोडे, प्रा. युवराज पवार, तर विद्यार्थ्यांतून मानसी राऊत, उमेश कालेकर, आचल डांगे, साहील सरोदे, ओम कुंजीर, साक्षी गायकवाड, शितल कालेकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
पहिल्या दिवशी बँकॉक विद्यापीठात आंतरराष्ट्रीय सहसंबंध अधिकारी डॉ. विर्सान व फ्रान्सच्या द इस्टिस्टूट ऑफ नॉलेज आणि इनोव्हेशनचे सहसंस्थापक डॉ. विनसेंट रिबेरीए यांनी त्यांच्या विद्यापीठाची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी थायलंडच्या नामांकित शासकीय आंतरराष्ट्रीय केस्टार्ट विद्यापीठाला भेट देत तेथील आंतरराष्ट्रीय सहसंबंध अधिकारी डॉ. पिटजुझा व डॉ. पतामापार्न यांच्यांकडून विद्यापीठाविषयी माहिती  घेतली. शैक्षणिक देवाण-घेवाण करण्यासाठी दोन्ही विद्यापीठांशी सामंजस्य करारही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकीच्या अद्ययावत प्रयोगशाळांची पाहणी केली. तिसऱ्या दिवशी येथील सर्वात मोठी हिरे कंपनी ‘जेम्स फॅक्टरी’ला भेट देऊन कच्च्या स्टोनपासून हिरा कसा घडवला जातो, याचे प्रात्यक्षिक अनुभवले. तसेच विद्यार्थ्यांना व्हिसा, इमिग्रेशन, करन्सी एक्सचेंज आदी माहिती मिळाली.
केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा देशमुख-जाधव व विभावरी जाधव, खजिनदार विनोद जाधव यांनी या सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉ. अभिजित औटी आणि सर्व सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
डॉ. अभिजीत औटी यांनी केजे शिक्षण संस्थेच्या व महाविद्यालयाच्या कार्याबद्दल सादरीकरण केले. एआय, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स अशा नवतंत्रज्ञानाबद्दल जाणून घेत विद्यार्थी व प्राध्यापकांनी भारतीय व विदेशी शिक्षणपद्धतीचे अवलोकन केले. विदेशी शिक्षण पध्द्तीमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणाला व संशोधनाला अधिक वाव दिला जात असल्याचे पाहायला मिळाले, असे डॉ. औटी यांनी नमूद केले.