चोखंदळ पुणेकर खवय्यांना ‘शालिमार’ची मेहमाननवाजी

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट पाहतात. चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’साठी कोंढव्याच्या कौसर बागेतील शालिमार केटरर्स अविरत सेवा देत आहे. त्यामुळे रमजान महिन्यात दरवर्षी अस्सल खवय्यांची पावले स्वादिष्ट पदार्थांची चव चाखण्यासाठी ‘शालिमार’कडे वळतात. बिगरमुस्लिम समाजातील सर्वच वयोगटातील ग्राहक ‘शालिमार’चा मान आहे.

‘शालिमार’चे प्रमुख नुसरतभाई यांच्या विशेष मेहमाननवाजीमुळे ग्राहक स्टॉल शोधत येतात व मोठ्या चवीने येथील पदार्थ चाखतात. प्रत्येक ग्राहकांची आपुलकीने चौकशी करणे, ‘आधी चव बघा आणि मग खा’ या नुसरतभाईंच्या आपुलकीच्या आग्रहामुळे ग्राहकांना ते आपलेसे करतात. नुसरतभाई यांची मुलगी अर्शिन हॉटेल व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवी घेऊन वडिलांच्या हॉटेल व्यवसायात इनोवेशन करीत नव्या पिढीला आवडणारे खाद्य पदार्थ समाविष्ट करत आहे. तर मुलगा रियाझही या कामात आहे.

अर्शीन शेख म्हणाल्या, “अब्बूजान (नुसरतभाई) यांचा प्रत्येक ग्राहकाशी जोडलेली नाळ आणि येथील ६०-७० मांसाहारी विशेष पदार्थ, जिभेवर विरघळणारे स्वीट खाल्ल्याशिवाय खव्वयांचे समाधान होत नाही. अफगानी लेग, दालचा खाना, कबाब, लखनवी पुलाव, चिकन-मटण बिर्याणी, चिकन सामोसा, चिकन ६५, लॉलीपॉप, मटण तवा, चिकन व मटण हंडी, रुमाली रोटी आदी पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती आहे. यातही दालचा खाना आणि गोड पदार्थात शाही तुकडा, फेरणी न खाता खवय्ये माघारी परत येणे अशक्यच आहे.

नुसरतभाई म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून या व्यवसायात आहे. आपुलकी, सर्वधर्म समभाव, सर्वांशी मैत्री आणि जिव्हाळा जपत येणाऱ्या प्रत्येकाची व्यवस्थित मेहमाननवाजी करतो. चांगले काम करताना अडचणी खूप येतात पण मी थांबत नाही. त्यात सर्वधर्मियांची मोठी साथ मिळाली. मुस्लिम बांधव दिवसभराचा कडक उपवास धरल्यानंतर रात्री ७.३० नंतर रोजा सोडण्यासाठी रुचकर, स्वादिष्ट, पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थासाठी शालिमार केटरर्सला भेट देतात. खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेऊन मुस्लिम बांधव रोजा सोडतात. याशिवाय सर्वधर्मीय खवय्ये याठिकाणी मोठी गर्दी करतात. हा स्टॉल दुपारी ४ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू असतो.