जेजुरीचा खंडोबा मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत!

156

मोडी दस्तऐवजातून दागिने आणि वस्तूंची सापडली यादी

पुणे : मराठा कालखंडात सर्वात श्रीमंत देव हा जेजुरीचा खंडोबा होता. हे आता त्याकाळातील कागदपत्रांच्या आधारेही सिद्ध झाले आहे. उगाच जेजुरीला “सोन्याची जेजुरी’ म्हणत नव्हते हे या कागदपत्रातील संपत्तीच्या उल्लेखावरून दिसून येते. त्याकाळात तिरुपती बालाजी पेक्षाही जेजुरीचा खंडोबा सर्वाधिक श्रीमंत देव होता.

मोडी लिपीचे अभ्यासक राज चंद्रकांत मेमाणे हे “श्रीक्षेत्र जेजुरी शिवकालीन आणि पेशवेकालीन पत्रव्यवहार’ या विषयावर सध्या संशोधन करत आहेत. त्यांना पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरात मोडी लिपितील कागदपत्रे सापडली आहेत. त्यात हा उल्लेख सापडला आहे.

एवढेच नव्हे तर त्यात जेजुरीच्या खंडोबा आणि म्हाळसादेवी यांच्या दागिने आणि अलंकारांची भली मोठी यादीच मिळाली आहे. ही यादी इ.स.1811 म्हणजे पेशवाईच्या अखेरच्या कालखंडातील आहे. त्यातील देवाच्या विविध अलंकारांची यादी वाचून डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही.

श्री खंडोबा देवाचे सुमारे 75 आणि म्हाळसादेवीचे सुमारे 40 असे शंभरहून अधिक वेगवेगळे खास पेशवाईतील दागिन्यांची नोंद यामध्ये आहे. त्यामध्ये डोक्‍यावरील शिरपेचापासून ते पायातील खडावापर्यंत प्रत्येक दागिना हा सोन्याचा, चांदीचा आणि रत्नजडीत अशा तिन्ही प्रकारात हे दागिने असून, सोन्याचे, चांदीच आणि रत्नजडित असे स्वतंत्र प्रकारात ते होते.

खंडोबाच्या अंगावरील दागिन्यात शिरपेच, शीरताज, तुरा, भांग-टिळे, मुंडावळ्या, बाशिंग, चंद्र-सूर्य, बिकबाळी, डोळे, नाक, कंठी, मोहनमाळ, गांठा, पदकयुक्त सोन्याची साखळी, गळ्यातील तोडा, कानातील कुंडले, हातात काकणे, कडी, जानवे, करदोडा, मान, पोट, पाठ यावरील कवच, शिक्‍क्‍याच्या अंगठ्या, भुजबंद (बाजूबंद), पेट्या, पवित्रे, वाघनखे, पायातील घागऱ्या, जोडे, खडावा, त्रिशूल, डमरू, ढाल, तलवार, धनुष्यबाण, अक्षयपात्र इत्यादी.

म्हाळसादेवीच्या दागिन्यात वेणी, मंगळसूत्र, चिंचपेट्या, कर्णफुले, कुंडले चंद्रहार, पुतळ्यांची माळ, बोरमाळ, माणिकमोती, पोवळे यांची माळ, बाजूबंद, ठुशी, कंठा, घागऱ्या, तीन प्रकारच्या नथ, शिवलिंगावरील कवच आदींची नावेही यादीत आहेत.

त्याचबरोबर अनेक भक्त नवसाचे घोडे, हत्ती, गाय, बैल, टोणगे, कुत्रे इत्यादी प्राणीही सोन्या चांदीचे बनवून वाहात असत. तशा वस्तूही देवाच्या खजान्यात खूप होत्या. तसेच पूजेचे साहित्य धूप आरती, पंचारती घंगाळे, घागर, तांब्या, हंडा, चंबू, पळी पंचपात्र, लोटी, हेही सोन्या-रुप्याचे होते. याशिवाय देवाचे निशाण, अब्दागिरी, छत्री, पालखी, भालदार-चोपदार यांच्या हातातील दंड हे देखील सोन्या-चांदीमध्ये बनवलेले होते. या ऐश्‍वर्यामुळेच आणि खंडोबा देव इतका श्रीमंत असल्यामुळेच जेजुरी देवस्थान अनेकवेळा लुटल्याचे उल्लेखही कागदपत्रांमधून आढळतो.

दरोडा पडल्याचा उल्लेख 
पेशवे दप्तरमधील कागदपत्रांमध्ये इ.स.1813 मध्ये देवस्थानवर दरोडा पडल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर इ.स. 1925 मध्ये पुण्यातून देवाच्या मूर्ती चोरीला गेल्याचे समजते. ही दरोडे पडण्याची परंपरा अगदी नव्वदच्या दशकापर्यंत सुरू होती. सदरहू दागिन्यांची यादी आणि याचबरोबर जेजुरीसंदर्भातील अनेक महत्त्वाची पत्रे याविषयी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत मेमाणे आपला शोधनिबंध वाचणार आहेत.