नारायणगाव : मनसे, राष्ट्रवादीत सत्तासंघर्षाचा “ट्रेलर’

111

जुन्नरचा राजकीय आखाडा पेटला : आमदार सोनवणे व अतुल बेनके यांचे शाब्दिक द्वंद सुरू
नारायणगाव : जुन्नर तालुक्‍यात मनसेचे आमदार शरद सोनवणे व राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्यामध्ये चाळकवाडी टोलनाका, पुणे-नाशिक बाह्यवळण, विकासकामांसाठी दिला जाणारा स्वनिधी, शासकीय निधीतून होणारी विकासकामे, कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादविवाद अशा अनेक कारणांनी जुन्नर तालुक्‍याचा राजकीय आखाड्याचे “ट्रेलर’ निवडणुकीपूर्वीच तापले आहे. तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकां जाहीर होताच या आखाड्याचा खरा “पिक्‍चर’ जनतेसमोर येऊन आग “ओकेल’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात.

जुन्नर तालुक्‍यात ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये सर्व सामान्यांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी तर या महिन्यात जर धरण क्षेत्रात पाऊस पडला नाहीतर शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात धरणातून पाणी सोडण्याचा हालचाली सुरू आहेत. तर स्वाइन फ्यू, मलेरिया, डेंग्यू यासारखे संसर्गजन्य घातक साथीचे रोगाचे थैमान सुरू असून या आजारांनी नागरिक बेजार झाले आहेत. तर विरोधक आणि सत्ताधारी राजकीय आखाड्यात रममाण झाले असल्याने नागरिकांनी कोणाकडे पाहवे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सरकारी कार्यालयांमधून सर्व सामान्यांची कामे पैशांची मागणी पूर्ण केल्याशिवाय होत नाहीत. अनेकवेळा विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागतात. 2015 पासून तालुक्‍यात चार तहसीलदार आले आहेत. तालुक्‍याचे तत्कालीन गटविकास अधिकारी सतीश गाढवे व ग्रामविकास अधिकारी यांच्यातील संघर्ष अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त असताना विरोधक याकडे लक्ष देत नसून ते विरोधी पक्षाची भूमिका बजाविण्यात कमी पडत आहेत. त्या उलट आमदार सोनवणे यांनी पक्ष विरहित विविध गावांमध्ये विकासकामावर भर दिला आहे. सर्व सामान्य माणसापर्यंत जाऊन स्वनिधीच्या माध्यमातून राज्यात इतर आमदारांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मात्र, आमदार सोनवणे यांचे समर्थक विनाकारण अनेक व्हाट्‌सऍप ग्रुपवर विकासकामांच्या माहितीवर चर्चा न करता विनाकारण असलेल्या मुद्द्याअंवर वादविवाद करीत असल्याने सोनवणे यांनी अशा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देऊन असे वादविवाद न करता त्यांनी शांतात ठेवण्याचे आवाहन केले तर त्यांचे तालुक्‍यातील वजन आणखी उंचावेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच त्यांनी सर्व शासकीय आधिकाऱ्यांवर अंकुश ठेवला पाहिजेल. आधिकारी व कर्मचाऱ्यांशी वादविवाद, मारहाण न करता त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी जुळवून त्यांच्याकडून तालुक्‍याच्या विकासकामे करणे गरजेचे आहे. प्रलंबित प्रश्‍नांचा पाठपुरावा केला पाहिजे मात्र, असे न करता ते विरोधकांच्या प्रश्‍नांवर वेळ घालवत तालुक्‍यातील वजन कमी करीत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ
आमदार सोनवणे यांच्या विषयी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यानी पुणे-नाशिक महामार्गाच्या समस्येवरील विविध रंजनात्मक माल मसाला टाकून टीकात्मक व बदनामी करणारी पोस्ट असलेली एक व्हिडीओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. त्याचा परिणाम आमदार सोनवणे व राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पुन्हा सुरू झाला असून दोघेजण विकासकामांऐवजी एकमेंकांवर चिखफेक करीत नागरिकांना चघळण्यासाठी विषय देत असल्याने आगामी निवडणुकीसाठी ही या दोघांसाठी धोक्‍याची घंटा ठरू शकते. तर याचा फायदा अन्य विरोधकांनी घेतला तर दोघांच्या भांडण्यात तिसऱ्या लाभ होऊ शकतो याकडे या दोघांनी लक्ष दिले पाहिजे अशी चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये सुरू आहे.

कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेणे गरजेचे
आमदार शरद सोनवणे व अतुल बेनके यांच्यामध्ये 2015 पासून राजकीय संघर्ष वाढत चालला आहे. मात्र त्याचा राजकीय परिणाम हा जुन्नर तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. निवडणुकी पूर्वी नेते व कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक होऊन जाते त्यानंतर नेते सत्तेसाठी एकमेकांशी (विरोधकांशी) साटेलोटे करून युती करतात व सत्ताकेंद्रे आपल्या ताब्यात ठेवतात आणि कार्यकर्ते मात्र एकमेकांशी कायमचे वैर घेऊन भांडत बसतात. अनेक राजकीय गुन्हे आपल्या अंगावर घेऊन आयुष्याचे नुकसान करून घेतात. अशा अनेक राजकीय घडामोडीमुळे जीवनात व राजकारणात उलथापालथ सुरु असते, कार्यकर्त्यांनी वेळीच सावध भूमिका न घेतल्यास जीवनात अनेक संकटांना सामोरे जाण्याची तयारी सुरु ठेवावी लागेल, असेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.