ATM मधील पैसे चोरीपासून सावध राहण्‍यासाठी ‘या’ उपाययोजना लक्षात ठेवा!

94

नवी दिल्‍ली : नुकतेच एसबीआयने ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार वरून २० हजार पर्यंत कमी केली आहे. एसबीआय डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांना ATM मधून फक्त २०,००० रुपये काढता येतील. अचानक झालेल्या या बदलामागे एक कारण आहे. कारण आता ATM मधून पैसे चोरी होण्‍याचे प्रमाण वाढत आहे.

एसबीआय बँकेकडे मागच्या काही काळामध्ये फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. अशा फसवणुकीची घटना वाढत असल्‍याने हा निर्णय एसबीआयने घेतला असावा. सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतलेली असतानाही चोर ATM मधून पैसे कसे चोरतात ? असा प्रश्‍न पडतो. याला ‘स्कीमिंग’ म्‍हणतात. हा चोरीचा एक प्रकार आहे. स्कीमिंग पद्धतीने ATM मधील लाखो रुपये चोरल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. असे स्कीमिंग कोणाच्‍याही बाबतीत होवू शकते..यापासून वेळीच सावध राहण्‍यासाठी जाणून घेवूया, स्‍कीमिंग म्‍हणजे काय?, व त्‍यावरील उपाय….

स्‍कीमिंग म्‍हणजे काय?
१.स्कीमिंग म्हणजे कार्ड धारकाची माहिती चोरणे. यामध्ये ATM मशिनच्या कार्ड स्लॉटमध्ये एक लहानसे उपकरण बसवले जाते. या उपकरणाला स्कीमर्स म्हणतात.
२. आपण जेव्हा कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकून स्वाईप करतो तेव्हा या स्कीमर्सद्वारे कार्डमधली माहिती चोरली जाते.

३. माहिती सोबत तुमचा पिन नंबर सुद्धा गरजेचा असतो. त्यासाठी किपॅडच्या वर कॅमेरा बसवला जातो. पिन नंबर टाईप केल्यावर लगेचच कॅमेरा तो पिन कैद करतो.
४. या माहितीचा वापर करून इतर ATM मशीन्समधून पैसे चोरले जातात किंवा मग ऑनलाईन खरेदी केली जाते.

५. काहीवेळा पिन नंबर जाणून घेण्यासाठी किपॅडवर एक पातळ थर लावला जातो. आपण टाईप करताना उमटलेल्या ठश्यांचा वापर पिन नंबर ओळखण्यासाठी केला जातो.

अशा मशीन कशा ओळखायच्‍या ?
१. ज्या ATM मशीन सोबत चोरांनी छेडछाड केली आहे तिथे कार्ड रीडर नवीन कार्ड स्वीकारण्यासाठी जास्त वेळ लावतो.
२. याशिवाय कार्ड रीडरचा भाग सहजपणे बाहेर काढता येण्यासारखा किंवा अधांतरी बसवलेला वाटू शकतो.
३. किपॅडमध्ये काही विचित्र प्रकार दिसू शकतात. जसे की सरकलेला किपॅड किंवा अलगद जोडलेला किपॅड. असे किपॅड्स पिन नंबर चोरण्यासाठी लावले असण्याची शक्यता असू शकते.
‘स्कीमिंग’ पासून सावध कसे राहयचे यासाठी काही उपाययोजना:
१. पिन नंबर टाकताना आपल्या हातांनी किपॅड झाका. चोरांना तुमचा पिन नंबर माहित नसल्यास कार्ड मधून चोरलेल्या माहितीचा काहीच उपयोग होणार नाही.
२. जिथे माणसांची नेहमीच गर्दी असते तिथे सहसा स्कीमर्स लावता येत नाहीत. कमी माणसे ATM मध्‍ये जात असलेल्या ठिकाणी स्कीमर्सचा धोका होण्‍याची शक्‍यता. बँकेच्या ATM मधून किंवा गर्दीच्या ठिकाणी असलेल्या ATM मधून पैसे काढणे कधीही सुरक्षित असते.
३. खात्यातून पैसे चोरी गेल्याचा संशय येत असेल तर लगेचच तक्रार करा.
४. RBI च्या सूचनेनुसार जेवढ्या लवकर तुम्ही तक्रार दाखल कराल तेवढ्या लवकर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता असते.
हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन पद्धतीने पैशांची चोरी होत आहे. अशी फसवणूक होऊ नये म्हणून वरील उपाय लक्षात ठेवण्‍याची गरज आहे.