पक्षीमित्र सचिन शिंगारे, सौ. सुनीता शिंगारे यांच्याशी  ‘जीविधा’ कट्टयावर रंगला संवाद

153

उलगडला जखमी पक्ष्यांना जीवदान देण्याचा ध्यास !

पुणे : जखमी पक्ष्यांना जीवदान देण्याचा सांगलीच्या शिंगारे दांपत्याचा ध्यास, प्रयत्न आणि अडचणींचा पट उलगडला आणि निसर्गप्रेमी पुणेकर भारावून गेले ! निमित्त होते जखमी पक्ष्यांना वाचवण्याचे काम सांगली येथे करणारे पक्षी मित्र दांपत्य सचिन शिंगारे, सौ. सुनीता शिंगारे यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे !

ही मुलाखत ‘जीविधा’, निसर्गसेवक व ‘देवराई ट्रस्ट’ आयोजित कट्टा, बुधवार दि. 26 सप्टेंबर. सायंकाळी 6.30 वाजता,इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, सचिन तेंडुलकर जाॅगिंग पार्क समोर येथे पुण्यात आयोजित करण्यात आली  होती. ‘जीविधा’चे संचालक राजीव पंडीत यांनी प्रास्ताविक केले.

सौ. चित्कला कुलकर्णी, प्रमोद माळी यांनी शिंगारे दांपत्याशी संवाद साधला. देवराई ट्रस्टचे धनंजय शेडबाळे, जीविधा च्या संचालक वृंदा पंडीत यांनी स्वागत केले. सचिन व सौ सुनीता शिंगारे यांनी आजपर्यंत ६ हजार जखमी पक्ष्यांना औषधोपचार करून निसर्गात परत सोडले आहे. त्यात चिमणी, कावळे,तीतर,कॉरबेट, कोतवाल, करकोचा आदी पक्ष्यांचा समावेश आहे.जखमी पक्ष्यांना घरी औषधोपचार केले, घरीच खाऊ घातले.

या व्यतिरिक्त कासव, सापांनाही जीवदान दिले आहे. त्यांच्या परीसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे पक्षांना घरटी बांधायला जागा नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कृत्रिम घरटी बांधली. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही हे जोडपे गेली अनेक वर्षं पदरचे पैसे घालून पक्षी संवर्धनाचे काम करत आहे. त्यांनी अनेक ह्दयस्पर्शी अनुभव सांगीतले आणि पुणेकर हेलावून गेले. जखमी पक्ष्यांना कसे हाताळावे, काय खायला घालावे, निसर्गात कसे सोडावे याबाबत उपस्थितांच्या प्रश्नांनाही शिंगारे दांपत्याने उत्तरे दिली.