रुग्णांच्या उपचारासाठी सव्वाचारशे कोटींचा निधी

146

नाशिक : पैशांची अडचण व उपचारांची कमतरता यामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये. त्यासाठीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना राबविण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत ही योजना सरकारकडून पोहोचविण्यात आली आहे. तीन वर्षांमध्ये या योजनेचा ८० टक्के रुग्णांनी लाभ घेतला आहे. या योजनेसाठी तीन वर्षांत सव्वाचारशे कोटींचा निधी मंत्रालयाने उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी दिली.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत २-डी इको तपासणी शिबिर शालिमार येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात झाले. हे शिबिर शुक्रवारी व शनिवारी झाले. शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांनी तपासणी केली. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख विशेष कार्य अधिकारी शेटे यांनी संदर्भसेवा रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या बालपणापासून हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची चौकशी शेटे यांनी केली. त्या वेळी ते म्हणाले, की सरकारी रुग्णालयात सर्व सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांपेक्षाही अधिक सुसज्ज तंत्रज्ञान सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. कोणताही रुग्ण पैशांअभावी किंवा उपचारांअभावी दगावणार नाही, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात येत नसल्याने प्रत्येक अर्जदारास याचा फायदा होत आहे. सरकारी रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात रुग्णांमध्येही सकारात्मकतेची भावना निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयांऐवजी सरकारी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहे, असा दावा शेटे यांनी केला. योजनेतील नियमांतर्गत अर्ज करणाऱ्या रुग्णांना नक्कीच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येतही लवकरच वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.