स्वाईनफ्ल्यूचा चाकण मध्ये दुसरा बळी

131

कडाचीवाडी येथील विवाहितेचा मृत्यू

चाकण (अशोक टिळेकर ) : चाकण व परिसरात स्वाईन फ्ल्यूने चांगलेच डोके वर काढले असून, गेल्या आठ दिवसांपूर्वी मेदनकरवाडी येथील एका विवाहितेच्या मृत्यू नंतर आता कडाचीवाडी ( ता. खेड ) येथील पसतीस वर्षीय विवाहितेचा या गंभीर आजाराने बळी गेला आहे. चाकण भागातील स्वाईन फ्ल्यूचा हा दुसरा बळी असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शर्मिला एकनाथ कड ( वय – ३५ वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड ) असे स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रदीप शंकर कड ( वय – २६ वर्षे, रा. कडाचीवाडी,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गेल्याच आठवड्यात अनिता सिंग ( वय – ३० वर्षे, रा.मेदनकरवाडी, ता.खेड, जि. पुणे.) या विवाहितेचा या गंभीर आजाराने मृत्यू झाला होता. शर्मिला कड यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचा पोझीटीव्ह आहवाल प्राप्त झाला आहे. कड यांना सर्दी, खोकला, दमा लागणे, छातीत जळजळ होणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा अखेर मृत्यू झाला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.