सार्वजनिक वाहतूक सक्षम, खासगी वाहनांवर प्रतिबंध हवा

पुणे : सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासह धोरणांची काटेकोर अंमलबजावणी, शहराचे दूरगामी नियोजन, खासगी वाहनांवर नियंत्रण, पादचारी व सायकलस्वारांना प्रोत्साहन आणि प्रभावी वाहतूक जनजागृती यातूनच पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मार्ग निघेल, असा सूर ट्रॅफिक परिषदेत शनिवारी उमटला.
‘वेकअप पुणेकर’ या लोकचळवळीच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ट्रॅफिक परिषदेचे आयोजन केले होते. संयोजक माजी आमदार मोहन जोशी, नगररचना तज्ज्ञ प्रांजली देशपांडे, पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी, रिक्षा पंचायतचे नितीन पवार, ‘सकाळ’चे मुख्य बातमीदार मंगेश कोळपकर, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे मुख्य बातमीदार सुनीत भावे यांच्यासह पुण्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पुणेकर नागरिक उपस्थित होते. या परिषदेत वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजना, रस्ते सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक सुधारणा यावर विचारमंथन झाले.
‘रिक्षा चालक आणि प्रशासनाचे धोरण’वर बोलताना नितीन पवार म्हणाले, “आज पुण्यात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला की, सर्वप्रथम रिक्षाचालकाला दोषी ठरवले जाते. वाहतुकीसंबंधी निर्णय घेताना रिक्षाचालकांवर अनेक नियम लादले जातात. रिक्षा थांबांपेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर दिसत आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी रिक्षाचा खुला परवाना यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुण्याच्या सर्वांगीण वाहतुकीशी रिक्षाचालकाला जोडले गेले पाहिजे”.पीएमपीएल सक्षमीकरणावर जुगल राठी म्हणाले, “सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस हा महत्वाचा घटक आहे. बसची संख्या, वारंवारिता, त्यातील सोयीसुविधा यावर गांभीर्याने विचार व्हावा. प्रवाशांच्या प्रमाणात बसची संख्या उपलब्ध करून द्यावी. बसथांबे चांगल्या स्थिती असायला हवेत. केवळ नवीन गाड्या घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा लोकांना फायदा होईल, असे पाहावे. पीएमपीएलमध्ये गेल्या १७ वर्षात २१ अध्यक्षांची बदली झाली. त्यामुळे नियोजनाची घडी बसत नाही. खासगी वाहनांची संख्या रोखायला हवी.”

‘प्रसार माध्यमे व वाहतूक कोंडी’वर बोलताना सुनीत भावे म्हणाले की, प्रसार माध्यमांनी नेहमीच नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य दिले आहे. विविध कारणांनी रस्ते बंद केले जातात; त्यातून संपूर्ण शहराला वाहतूक कोंडीचा त्रास होतो. पुण्यात मेट्रो मार्ग सुरु झालेत; त्या स्टेशनजवळ सार्वजनिक वाहतुकीची सोय करायला हवी. रिक्षाचालकांना थांबा उपलब्ध करायला हवेत. वाहतूक कनेक्ट होणे गरजेचे आहे. धोरणे, कायदे होतात; मात्र त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. वाहतूक कोंडी सोडवायची असेल, तर पोलिसांनी कठोर व्हायला हवे. एक दिवस तरी विनावाहन किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे.”
‘वाहतूक कोंडींवर प्रसार माध्यमांची भूमिका’वर बोलताना मंगेश कोळपकर म्हणाले, “आज पुण्याच्या रस्त्यांची रुंदी वाढवणे गरजेचे आहे. पीएमटीने आज पुण्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या ११ लाखाहून अधिक आहे. त्यांचा प्रवास कसा सुखकर करता येईल, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. नवीन अधिकारी आला की जुने धोरणही बदलले जाते. असे न होता अधिकारी बदलला, तर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला जुन्या धोरणांविषयी माहिती दिली पाहिजे. ज्यामुळे धोरणांमध्ये बदल होणार नाही”.वाहतूक कोंडीवरील उपायांवर बोलताना प्रांजली देशपांडे म्हणाले, “खाजगी वाहनांमुळे लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण पुण्यात अधिक आहे. खाजगी वाहनांवर मर्यादा आणणे गरजेचे आहे. त्यातूनच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासह त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत सुलभतेने कसा पोहचवता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. पुण्यात पीएमटी, मेट्रो, रिक्षा असे अनेक पर्याय आहेत. या गोष्टी सुधारल्या की आपोआप खाजगी वाहने कमी होतील आणि वाहतूककोंडी कमी होईल.”

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ लोकचळवळ उभारली असून, गेल्या महिनाभरात पुण्यातील अनेक चौकांतील कोंडी फोडण्यात यश आले आहे. वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने विविध घटकांशी चर्चा करून त्यातून अनेक उपाययोजना पुढे येत आहेत. याचा एक आराखडा करून संबंधित यंत्रणेला दिला जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात व त्याचा चांगला उपयोग करण्यात पुणेकरांनी पुढाकार घ्यायला हवा. अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून, नागरिकांचा याला उत्स्फूर्त मिळत आहे.”