किरकोळ कारणावरून दोन गटात राडा

177

चाकण येथील प्रकार : तुंबळ हाणामारीत पेटवली मोटार गाडी : एकुण तेरा जणांवर गुन्हा दाखल

 चाकण (अशॊक टिळकर) : किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या प्रचंड राड्यात आणि भांडणातून तुंबळ हाणामारी आणि एक मोटार पेटवून दिल्याची धक्कादायक घटना चाकण ( ता. खेड ) येथील वर्दळीचे ठिकाण असलेल्या मध्यवस्तीत घडली. या घटनेत चार चाकी वाहन जाळून खाक झाले असून, याप्रकरणी चाकण पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून रात्री उशिरा एकुण तेरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

राणी महेश जगनाडे ( वय – ३८ वर्षे, रा जुनी बाजारपेठ, चाकण, ता.खेड, जि. पुणे.) यांच्या फिर्यादीवरून अमोल लाटूकर, टिल्या घोडके,  मोनेश घोगरे, विवेक कुऱ्हाडे, अभिषेक घोडके, राहुल गोरे, अमोल तनपुरे, पन्या शिंदे ( सर्वजण रा. चाकण, ता. खेड, जि.पुणे,) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणी जगनाडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, वरील सर्वांनी बेकायदा गर्दी, जमाव जमवून विनापरवाना हातात लाकडी काठ्या व दगड आणून टील्या घोडके याने फिर्यादी राणी जगनाडे यांस तु माझी आई तुझी मुलगी त्रिवेणी हीस तू फोन का करतो, असे का सांगितले. तुझी पोरगी मला फोन करते, असे म्हणून फिर्यादी जगनाडे व फिर्यादीचे पुतणे दत्तात्रय मधुकर जगनाडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व दमदाटी करून फिर्यादी जगनाडे यांच्या इमारती समोर मोकळ्या जागेत लावलेली फिर्यादीची इको कार  ( क्र. एम. एच. १४, जी. एच. ७६५४ ) काठ्या व तुफान दगडफेक करून फोडली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.  दरम्यान, नंतर ही गाडी पेटवून देण्यात आल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

रामनाथ सुखदेव घोडके ( वय – १७  वर्षे, रा. खंडोबाचा माळ, चाकण, ता. खेड, जि.पुणे,) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राणी महेश जगनाडे,  दत्ता जगनाडे, सतपाल,  शेखर बनसोडे, विशाल मुंगळे ( सर्व रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे,) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडके यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, राणी जगनाडे यांनी मुलीला फोन का करतो, असे म्हणून फिर्यादीस घरात डांबून ठेवून बेकायदा विनापरवाना जमाव जमवून फिर्यादीस हाताने व लाकडी दांडक्याने जबर मारहाण व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या जबर मारहाणीत फिर्यादी घोडके यांच्या तोंडाला गंभीर दुखापत होऊन हाताला व डोक्याला मार लागला असल्याचेही त्यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

चाकण पोलिसांनी परस्पर आलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील एकुण तेरा जणांवर गु.र. नं. ७९५/२०१८ नुसार, भा.द.वि.कलम ३२३, ३२४ तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस हवालदार नामदेव जाधव यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव जाधव, अरुण लांडे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.