गणेशोत्सवादरम्यान गिरगाव चौपाटीवर परदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था

194

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे गणेशोत्सावासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे स्वागत

मुंबई, 5 सप्टेंबर 2018 : पर्यटकांमध्ये महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या दिमाखदार गणेशोत्सवाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे खास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवात परदेशी पर्यटकांना सहभागी होता यावे यासाठी गिरगाव चौपाटीवर ३०० हून अधिक व्यक्ती सामावून घेण्याची क्षमता असलेला छज्जा उभारण्यात येणार आहे.

या उपक्रमाला गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन नोंदणी सुविधा, शुद्ध पेयजल, मोबाइल स्वच्छतागृहे, बससेवा आणि अल्पोपहारासारख्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत

या सहकार्यातून गणेशोत्सव हा एक आंतरराष्ट्रीय सोहळा म्हणून प्रस्थापित करण्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने पर्यटकांना भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा आणि परंपरांचा अभ्यास करता येईल आणि त्यात सहभागी होता येईल आणि १२६ वर्षांचा वारसा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचाही अनुभव घेता येईल.

या वेळी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री. जयकुमार रावल म्हणाले, “महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन परदेशी पर्यटकांना घेता यावे यासाठी खास छज्जा उभारण्यात येणार आहे. या छज्जामध्ये शुद्ध पेयजल, मोबाइल स्वच्छतागृहे, बस सेवा आणि अल्पोपहार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पर्यटकांना या छज्जावरून गिरगाव चौपाटवर येणाऱ्या गणेशमूर्ती पाहता येतील आणि या माध्यमातून त्यांना या सोहळ्याचे भव्यस्वरूप अनुभवता येईल.”

महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याचे प्रधान सचिव श्री. विजय कुमार गौतम (आयएएस) म्हणाले, “या उत्सवाला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देणे, हा आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नोंदणी सुविधेच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करत आहोत. आम्ही परदेशी पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर खास छज्जा उभारण्याची सोय केली आहे. या छज्जावरून पर्यटकांना संपूर्ण शहरातील गणेशमूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. या उत्सवासाठी जगभरातील पर्यटक महाराष्ट्रात आकर्षित होतील, असा मला विश्वास आहे.”

या प्रसंगी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुहास दिवसे म्हणाले, “गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध संस्कृती आणि समाजातील व्यक्ती एकत्र येतात. दरवर्षी एमटीडीसीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या गणेश दर्शन सहलीचा अनुभव घेण्यासाठी विविध देशांतील पर्यटक येतात. परदेशी पर्यटकांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांना राज्यातील या लोकप्रिय उत्सवाचा अनुभव घेण्याची संधी देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेशी सहयोग करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

एमटीडीसीबद्दल:

पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशे, महाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारे, अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे, नैसर्गिक गुंफा, धबधबे, भव्य किल्ले, विविधरंगी महोत्सव, प्राचीन तीर्थस्थळे, वस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या: http://www.maharashtratourism.gov.in/