पाकिस्तानने नवज्योत सिंंग सिद्धूंना पाडले तोंडघशी

174

इस्लामाबाद –  भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंंग सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी केलेला पाकिस्तान दौरा चर्चेचा विषय ठरला होता. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. मायदेशात परतल्यावर पाकिस्तानमधील आदरातिथ्याचे कौतुक करणाऱ्या सिद्धू यांना आता पाकिस्तानने  तोंडघशी पाडले आहे.

या भेटीदरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुखांशी झालेल्या चर्चेत भारत-पाकिस्तान सीमेपासून  अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या करतार साहब यांच्या दर्शनासाठी सीमेचे दरवाजे उघडण्याबाबत सकारत्मक चर्चा झाल्याचा दावा सिद्धू यांनी केला होता. मात्र पाकिस्तानने याबाबत स्पष्टीकरण देताना केवळ एका घटनेमुळे याचा निर्णय होऊ शकणार नाही. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्यानंतरच निर्णय होऊ शकेल, असे म्हटले आहे. पाकिस्तानने केलेल्या या दाव्यानंतर सिद्धू आणि काँग्रेसवर टीका केला आहे.

करतारपूरमध्ये गुरुनानक यांनी 18 वर्षे वास्तव्य केले होते. भारत आणि पाकिस्तानदरम्यान करतारपूरपासून गुरदासपूरपर्यंत एक कॉरिडॉर बनवण्याचा प्रस्ताव तयार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव अधांतरी आहे. “पाकिस्तानचे लष्करप्रमुख स्वत:हून माझ्यापाशी आले व आपण दोघे एकाच संस्कृतीचे आहोत असे म्हणत त्यांनी आपुलकी व्यक्त केली. शिवाय गुरु नानकदेव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त करतारपूर सीमाचौकी खुली करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मी दुसरे काय करणे अपेक्षित होते?,” असे सिद्धू यांनी या गळाभेटीबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले होते.