Pune Prahar : फडणवीस यांना मन:शांतीची पुस्तके देणार : मंत्री मुश्रीफ

83

गडहिंग्लज : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यांचा व माझा विधानसभेतील प्रवेश एकाचवेळचा. फडणवीस पूर्वी हुशार होते. परंतु, आता त्यांना काय होतेय ते कळेनासे झाले आहे. सद्य परिस्थिती काय आणि ते बोलतात काय याचेही तारतम्य दिसत नाही. परिस्थितीला अनुसरून मन:शांती कशी मिळवायची याबाबत त्यांना तीन पुस्तके भेट देणार असल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज आज येथे लगावला. त्यांची हुशारी आणि मुख्यमंत्री पदाचा अनुभव लक्षात घेता कोरोना परिस्थितीचे आकलन करून त्यांच्याकडून सल्ल्याची अपेक्षाही मुश्रीफ यांनी व्यक्त केली. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, “”राज्यावर कोरोनाचे संकट आले असताना देवेंद्र फडणवीस राजकारण करीत आहेत. अशा संकटकाळात सकारात्मक सूचना देण्याऐवजी ते काहीही बोलत आहेत. सत्तेवर कोणीही असू द्या, पण संकटकाळात सरकारच्या बरोबर राहणे गरजेचे आहे. आज पुढारलेल्या अमेरिकेसारख्या देशानेही कोरोनापुढे हात टेकले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प रडकुंडीला आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोरोनावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना राजकारण करण्याची ही वेळ नाही.

पंधरा वर्षे मी मंत्री असताना फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते सत्तेवर आले मी विरोधात होतो. आता आम्ही सत्तेवर असून ते विरोधी पक्षनेते आहेत. दोघांचीही विधानसभेतील एंट्री एकाचवेळची आहे. पण मुख्यमंत्री झाल्याने ते सिनिअर झालेत. सत्तेच्या पाच वर्षात त्यांनी हम करे सो कायदा केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना फोडून भाजपात घेतले आणि भाजपातील काहींना त्यांनी घरचा रस्ता दाखवला. सत्तेत असताना त्यांना नाही म्हणणारा कोण सापडलेला नाही.

आता बदललेली परिस्थिती त्यांना सहन होईनाशी झाली आहे. म्हणूनच ते अशा काळात काहीही बोलत आहेत. हे चुकीचे आहे. राज्यावर संकट आले असताना काय बोलावे याची मर्यादा कशी काय दिसत नाही हेच कळेनासे झाले आहे. मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. दाट लोकवस्तीमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. परंतु मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेल्या फडणवीस यांनी या साऱ्या परिस्थितीचे आकलन आणि अभ्यास करून सरकारला सल्ला देणे अपेक्षित आहे. सर्वांनी मिळून कोरोनावर मात करण्याची वृत्ती महत्वाची आहे.”

“ती’ पुस्तके कोणती? 

पुस्तकांबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, “”संकटकाळात मनशांती कशी ठेवायची याचे मार्गदर्शन फडणवीसांना व्हावे म्हणून त्यासंदर्भातील पुस्तके देणार आहे. “मौनम सर्वाथ साधनम्‌, मौन व्रतातून मनाची शांती आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय’ अशा या तीन पुस्तकांचा यामध्ये समावेश असेल.”