Pune Prahar : पत्रकार बनणार मालक; एका डॉलरला विकली मीडिया कंपनी

161

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे उद्योगधंदे ठप्प झाले आहे. दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे. परिणामी अनेक मोठमोठ्या कंपन्या डबघाईला आल्या आहेत. अशीच काहीशी अवस्था मीडिया कंपन्यांचीही झाली आहे. आर्थिक टंचाईमुळे बेजार झालेली ‘स्टफ’ ही न्यूझीलंडमधील नामांकित मीडिया कंपनी केवळ एक न्यूझीलंड डॉलरला विकली गेली आहे.

‘स्टफ’ ही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील आघाडिच्या मीडिया कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जायची. या कंपनीचे हक्क ‘नाईन एंटरटेन्मेट’ या कंपनीकडे होते. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार ही कंपनी प्रामुख्याने अनेक नामांकित वर्तमानपत्र व नियतकालिकांची छपाई करण्याचे काम करते. शिवाय ‘स्टफ’ या नावाची त्यांची एक वेबसाईट देखील आहे. परंतु लॉकडाउनमुळे त्यांचा कॅश प्लो पूर्णपणे थांबला.

शिवाय त्यांनी ज्या अमेरिकी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते त्या सर्व कंपन्या डबघाईला गेल्या. परिणामी स्टफला कोट्यवधींचे नुकसान झाले. आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेलेली ही कंपनी कुठलाही व्यवसायीक खरेदी करण्यास तयार नव्हता. अखेर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिनेड बाउचर यांनी केवळ एक न्यूझीलंड डॉलर अर्थात भारतीय चलनानुसार ४६.४१ (आजचा भाव) रुपयांना ही कंपनी विकत घेतली.

स्टफ कंपनीत सध्या ४०० पत्रकार आणि ८०० इतर कर्मचारी काम करत आहेत. ‘नाईन एंटरटेन्मेट’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यूग मार्क्स यांनी गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत या व्यवहारामागचे कारण सांगितले. ते म्हणाले, “करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याआधीच ‘स्टफ’ने आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली होती. करोना विषाणूमुळे त्यांची उरलेली आशाही संपली.

सिनेड बाउचर एक हुशार व्यक्ती आहेत. त्यांनी विचार करुनच स्टफला खरेदी केलं असणार. मला आशा आहे की ते या कंपनीचे सुवर्ण युग पुन्हा एकदा परत आणतील.”