लावलेल्या झाडांचे संगोपन होणे गरजेचे

162
मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दादा वासवानी स्मरणार्थ १०१ वृक्षांचे रोपण
पुणे : “निसर्गसंवर्धनासाठी वृक्ष लागवड अतिशय महत्वाची असून, लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन होणे गरजेचे आहे. ‘निर्मल-हरित पंढरपूर अभियान’ अंतर्गत लावलेल्या झाडांचे तीन वर्षे संगोपन केले जाणार आहे. तसेच दणकट लोखंडी संरक्षक जाळ्या बसवून त्याचे संवर्धन केले जाणार आहे, ही आनंदाची बाब आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार व ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांनी केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री रिध्दी सिध्दी मंदिर गोपाळपूर रोड, पंढरपूर मंदिराच्या प्रांगणात पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन व देवराई नर्सरी थेऊर यांच्या वतीने जय गणेश हरित वारी अभियानांतर्गत दादा वासवानी यांच्या स्मरणार्थ १०१ देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सागर करंडे, नाशिक येथील साध्वी वेणूभारती महाराज, नगराध्यक्ष साधना भोसले, नगरपरिषद सदस्य नवनाथ रांगट, उमा डोंबे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष सचिन ढोले, विश्वस्त हभप शिवाजीराव मोरे, शकुंतला नडगिरे, फिनोलेक्सचे संजय अलिकेटी यांच्यासह मंदिरे समितीचे कर्मचारी-पुजारी उपस्थित होते.
शिवाजीराव मोरे म्हणाले, “दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट, वनराई, देवराई यांच्यासह इतर २२ संस्थांच्या पुढाकारातून ‘निर्मल-हरित पंढरपूर अभियान’ राबविले जात आहे. याअंतर्गत वृक्षारोपण करण्यात येत असून, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमार्गासह राज्यभरातून येणाऱ्या इतर १४० पालखीमार्गावर ९८९२३ इतकी झाडे लावली जाणार आहेत. ही सगळी देशी झाडे असून, देवरी नर्सरीचे रघुनाथ ढोले यांनी ही रोपे दिली आहेत.”
या लोखंडी जाळ्या चोरीला जाऊ नयेत, यासाठी लवकरच भंगार व्यावसायिकांची बैठक घेतली जाणार असल्याचे सागर करंडे यांनी सांगितले. दादा वासवानी यांच्या स्मृती जगविण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर १०१ झाडे लावण्यात आल्याचे मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका रितू छाब्रिया यांनी सांगितले.