Pune Prahar : अनोख्या पद्धतीने लाडक्या भाचीचा वाढदिवस साजरा

99

डोर्लेवाडी ( ता.बारामती ) झारागडवाडी येथिल रहिवासी आझाद शेख या दाम्पत्यांनी आपली लाडकी भाची महेक हिच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त गरीब, गरजू व निराधारांना “सोशल डिस्टन्स’ ठेवून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताची आवश्‍यकता असल्याने मामा आझाद शेख यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने आपल्या लाडक्या भाचीचा वाढदिवस साजरा केला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग ठप्प झाले आहे. देशात लॉकडाउन जरी आवश्‍यक असले, तरी या निर्णयामुळे अनेक गरजू व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रीमंतांनी घरात किराणा साहित्याचा मोठा साठा करून ठेवला असला, तरी गरीब गरजू व निराधारांचे काय? तसेच ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचेही वांदे झाले आहेत. काम केल्याशिवाय अनेकांची चूल पेटत नाही. अशा लोकांची संख्याही सर्वाधिक आहे.

अशा परिस्थितीत झारागडवाडी येथील आझाद शेख या दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब- गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व काळाची गरज ओळखून आझाद शेख यांनी रक्तदान केले. यावेळी त्यांनी भाचीचा प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा संकल्प करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमासाठी आई, वडील,आजी,आजोबा,मामा, मामी,काका,काकी,व मित्र परिवार यांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे आझाद शेख यांनी सांगितले.

भाचीच्या वाढदिवसानिमित्त लॉकडाउन कालावधीत आपल्या परीने जेवढे शक्‍य होईल तेवढे अशा गोरगरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व काळाची गरज लक्षात घेऊन रक्तदानही केले.

यावेळी मेहकचे आई वडील अरबाज शेख व अफसना शेख हे म्हणाले की आम्ही आमच्या मुलीचा प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. असे बोलताना सांगितले.