एका दिवशी हार्डवेअर, दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम, तिसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक, पुण्यात कोणत्या दिवशी कोणतं दुकान उघडणार?

359

पुणे | पुण्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील कोणती दुकानं कोणी आणि कधी उघडायची याबाबताचा संभ्रम आता मिटला आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर अत्यावश्यक दुकानांसह इतर दुकानांची वेळ देखील ठरली आहे. स्वतः पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनीच पुढाकार घेऊन याबाबतचा सुधारित आदेश काढला आहे. यानुसार रस्त्यावरील अत्यावश्यक आणि इतर 5 दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील. 1 किलोमीटरच्या अंतरावर अत्यावश्यक सर्व दुकाने सुरु राहतील, तर बिगर अत्यावश्यक 5 दुकानांमध्ये प्रत्येक दुकानाला एक वार ठरवून देत त्या वारानुसार ते दुकान सुरु राहणार आहे.

सुधारित आदेशानुसार बिगर अत्यावश्यक दुकानं वार ठरवून उघडण्याचे नियोजन आहे. त्यानुसार एका दिवशी हार्डवेअर, दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम, तिसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक असं वारानुसार दुकान उघडणार आहे. त्यामुळे दुकानदारांचा संभ्रम टाळण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांना देखील आपल्याल गरजेची वस्तू कोणत्या दिवशी मिळेल हे माहिती असेल. या साध्या पद्धतीतून ग्राहकांना गर्दी न करता शांतपणे खरेदी करता येईल, अशी माहिती शेखर गायकवाड यांनी दिली.

सुरुवातीला मनपा प्रशासनाने रस्त्यावरील 5 दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, कोणती 5 दुकाने उघडायची यावरुन संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने पुन्हा याबाबत सुधारित आदेश काढून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या दिशानिर्देशांमुळे पुण्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील कोणती दुकानं कोणी आणि कधी उघडायची याबाबतचा संभ्रम मिटला आहे.

शेखर गायकवाड म्हणाले, “सरकारने दोन दिवसांपूर्वी राज्यातील इतर दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानं उघडली जातील अशी उत्सुकता होती. मात्र, अशी दुकानं कोणत्या वेळेत सुरु होणार याबाबत काही गोंधळ होता. तो दुर होण्यासाठी आज सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान दुकानं उघडी राहतील. यात इतर 5 दुकानं उघडण्याबाबत प्रत्येक दुकानाला आपण वार ठरवून दिला आहे. त्याप्रमाणे ते सुरु राहतील.”