विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र; उद्या निर्णय होणार

221

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली आहे. दरम्यान, राज्यातील विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

राज्यपालांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे, की केंद्र सरकारने देशात लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शिथिल उपायांची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या जागांवर निवडणुका काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांसह होऊ शकतात, असे ते म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना निवडणूक आयोगाला पत्र लिहावे अशी विनंती करणारे पत्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज संध्याकाळी त्यांना दिले.

उद्या बैठक होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी परिषदेची निवड होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. दरम्यान, राज्यातील विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांच्या निवडणुका तातडीने घेण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ECI) केली आहे. राज्यपालांच्या या निर्णयाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय गृह मंत्रालयाशी सल्लामसलत शक्य तितक्या लवकर निवडणूक घेण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र अस्थिरतेत जाण्यापासून दूर राहिल आणि आपल्या राज्यघटनेची मूल्ये देखील टिकवून ठेवता येईल, असं मत फडणवीस यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.