ज्या डॉक्टरांसाठी टाळ्या वाजवल्या, त्यांच्यावरच हल्ला का? खासदार डॉ. अमोल कोल्हे व्यथित

78

पुणे : ‘कोरोना’ रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व्यथित झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी आपण डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या, थाळ्या, शंखनाद केला. मात्र आठ दिवसांनी या डॉक्टरांवर हल्ला होतोय. आठ दिवसात हल्ला होण्याइतकं असं काय घडलं? त्यामुळे आपण जबाबदार नागरिक आहात का? असा प्रश्न पडल्याचं खासदारांनी म्हटलं.

‘या कठीण काळात सर्व डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि प्रशासन जीवाची बाजी लावत आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ते रुग्णसेवा करत आहे. त्यांना सहकार्य करण्याचं औदार्य आपल्यात नाही का?’ असाच सवाल खासदार कोल्हे यांनी केला.

भारत पाकिस्तानची मॅच असेल किंवा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आपलं देशप्रेम उफाळून येतं. मात्र आताच्या परिस्थितीत ‘कोरोना’ विरुद्ध लढाई ही देशसेवा आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

निझामुद्दीनमधील ‘मरकज’ला जाऊन आलेल्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिली पाहिजे. त्यांच्या ओळखीत असलेल्या व्यक्तींनीही आरोग्य विभागाला संपर्क साधला पाहिजे. सोशल डिस्टन्स ठेवणं म्हणजे वाळीत टाकणं नव्हे, असंही डॉक्टर कोल्हे म्हणाले.

सर्वधर्मीय धर्मगुरु, मौलवींना एकच सांगणं आहे की तुम्ही आपल्या अनुयायांना सांगा. देव मंदिरात नाही, अल्ला मशिदीमध्ये नाही, येशू चर्चमध्ये नाही, तो गुरुद्वारामध्ये नाही, तर ते सर्व डॉक्टर, पोलिस प्रशासन आणि या रुग्णांची सेवा करणाऱ्या, ‘कोरोना’ विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकवटले आहेत, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

‘सध्या तुमच्याकडे तीन पर्याय आहेत, निमूटपणे प्रशासनाला सहकार्य करुन घरात राहणे, हिरोगिरी करुन बाहेर हिंडून स्वतःला आणि कुटुंबाला धोक्यात घालून हॉस्पिटलमध्ये राहणे किंवा भिंतीवरील फोटो फ्रेममध्ये’, अशा हटके शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला आवाहन केलं होतं.