“लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण?” पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न

388

करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या लॉकडाउनमुळे लोकांना घरातच कैद व्हावे लागले आहे. मात्र काही लोक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा अन्य काही कामांसाठी रस्त्यांवर फिरताना दिसतात. या लोकांना पुन्हा घरात पाठवण्यासाठी पोलिसांचा २४ तास जागता पाहारा सुरु आहे.

पोलीस ओरडून, घाबरवून आणि वेळप्रसंगी लाठीचा प्रहार करुन लोकांना घरातच थांबण्यास सांगत आहेत. मात्र पोलिसांच्या या कार्यप्रणालीवर विरोधी पक्ष नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस नागरिकांना बेदम मारत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने पोलिसांवर निशाणा साधला आहे.

“करोना विषाणूपासून वाचवण्यासाठी लोकांना मरेपर्यंत मारलं जात आहे. हे कसलं धोरण?” अशा आशयाचे ट्विट करुन रिचाने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

रिचा चड्ढा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मते मांडताना दिसते. या पार्श्वभूमीवर रिचाने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आहेत. काही जण रिचाच्या मताशी सहमत आहे. तर काही जण विरोधात. मात्र विराधात असलेल्यांनी रिचावर देखील टीका केली आहे.