#Coronavirus : करोनाशी लढण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद : पंतप्रधान

105

जागतिक महामारी असलेल्या करोनाशी लढण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बुधवारी देशवासियांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणाही मोदींनी यावेळी केली.

मोदी म्हणाले, करोना विषाणग्रस्तांची चाचणी करण्यासाठीच्या सुविधा, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE), अतिदक्षता विभाग (ICU), व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण या बाबींसाठी १५ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, करोनाच्या या वैश्विक महामारीतून वाचण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे सोशल डिस्टंसिंग. त्यामुळे लोकांची याची कडक अंमलबजावणी करावी असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केले आहे.

तसेच अनेक अफवा अशावेळी पसरतात. कृपया कोणतीही अफवा पसरवू नका आणि त्यापासून सावध राहा. राज्य सरकार, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. तुमचा जीव धोक्यात घालू नका. प्रत्येक नागरिक नियमांचं पालन करेल अशी अपेक्षा आहे. २१ दिवसांचा लॉकडाउन मोठा कार्यकाळ आहे. पण तुमच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं असून हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक भारतीय याचा सामना करेल आणि विजय प्राप्त करेल याची खात्री आहे. आपली आणि आपल्या लोकांची काळजी घ्या. कायद्याचं पालन करा. विजयाचा संकल्प करत ही बंधने स्विकारा, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.