हुश्श..! रुग्णालयातून पळून गेलेले कोरोनाचे 3 संशयित रुग्ण सापडले

234

नागपूरच्या रुग्णालयातून 5 रुग्ण पळाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या पाचही जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. या सगळ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय होता. यामुळे जेव्हा हे रुग्ण पळाल्याचं वृत्त नागपूरमध्ये पसरलं तेव्हा एकच घबराट उडाली होती. पोलिसांनी या रुग्णांना शोधण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू केली होती. अखेर यातील 3 जण सापडले असून ते रुग्णालयात परतले आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. या रुग्णांसाठीच्या आयसोलेशन वॉर्डबाहेर पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

नागपूरच्या मेयो रुग्णालयातून कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय असलेले जे पाच रूग्ण पळाले होते त्या सगळ्यांची तपासणी करण्यात आली होती आणि आवश्यक ते नमुनेही घेतले होते. यातल्या एका संशयित रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला या आजाराची लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालं आहे. उर्वरीत चार जणांचा अहवाल अजून प्राप्त होणं बाकी असल्याचं नागपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.सुर्यवंशी यांनी सांगितलं आहे. या सगळ्यांना शोधलं असून रुग्णालय प्रशासन त्यांना परत आणत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नागपूरमध्ये Corona Virus ची लागण झाल्याचा संशय असलेले 5 रुग्ण पळून गेले होते. रुग्ण पळाल्यानंतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला होता आणि या रुग्णांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत होता. या संशयित रुग्णांना नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्यांना आजाराची लागण झाली आहे की नाही हे तपासलं जात होतं आणि रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी हे रुग्ण शोधण्यासाठी अलर्ट जारी केला होता आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. नागपूरमध्ये 3 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या आजाराची महाराष्ट्रामध्ये एकूण 17 जणांना लागण झाली आहे. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी 45 वर्षांच्या एका व्यक्तीला या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले होते. त्याच्या बायकोला आणि मित्रालाही या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आले आहे. हे तिघे जण काही दिवसांपूर्वी अमेरिकेवरून मायदेशात परतले होते. या तिघांवर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.