Big Breaking : MPSC च्या आगामी परीक्षांबाबत आयोगाचे स्पष्टीकरण; वाचा सविस्तर बातमी!

148

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरोनाचे वादळ घोंगावू लागल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला. अभ्यासिकांकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याने त्या ओस पडल्याचे चित्र दिसून आले.

गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. याबाबतच्या सूचनाही शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोना आपला फास आवळू लागल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्य लोकसेवा आयागाने याची दखल घेत आगामी परीक्षांबाबत महत्त्वाची सूचना केली आहे. येत्या रविवारी (ता.१५) नियोजित असलेली सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा होणार की नाही, या संभ्रमात विद्यार्थी आहेत. त्यांचा हा संभ्रम आयोगाने दूर केला आहे. सदर परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असून या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाचे सचिव प्रदीपकुमार याबाबत म्हणाले की, ”परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. तसेच परीक्षेची सर्व तयारी झाली आहे. प्रश्‍नपत्रिकांचे देखील वितरण झाले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द केली जाणार नाही. केवळ एक तासाचा हा पेपर आहे. मात्र, या परीक्षेला उपस्थित उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच येत्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील इतर शहरातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरातील जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.