कविवर्य मंगेश पाडगावकर यांची जयंती साजरी

32

मुंबई : आपल्या कवितांनी जगण्याचा मंत्र सांगणारे महाराष्ट्रभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांना शब्द आणि सुरांची आदरांजली वाहत मंगळवारी त्यांची जयंती त्यांच्या कुटुंबीयांकडून मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली.

कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या (१० मार्च) जयंतीचे औचित्य साधून त्याचा मुलगा डॉ. अजित आणि मुलगी अंजली यांनी वरळी येथे काल संघ्याकाळी एका अभिवादन संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध गीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशोक पत्की उपस्थित होते.

पाडगावकरांच्या ‘अशी पाखरे येती आणिक, या गाजलेल्या गाण्याने संगीतकार मंदार आपटे यांनी अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात केली. सोबत सुप्रसिद्ध भावगीतकार अरुण दाते यांचा मुलगा अतुल यांनी आपल्या भारदस्त निवेदनाने पाडगावकर, यशवंत देव आणि दाते यांच्या घट मैत्रीचे अनेक किस्से सांगत गतकाळातील सोनेरी आठवणीना उजाळा दिला. मुंबई – पुणे घाटातील बटाटावडा आणि एका चेकच्या पैशाचा किस्सा ऐकताना उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.

“दिवस तुझे फुलायचे, मान वेळावुनी धुंद बोलू नको, डोळे कशासाठी अशी शुंगार आणि प्रेमाचा भावस्पर्श असलेले अजरामर गाणी गाऊन संगीतकार मंदार आपटे यांनी आसमंत पाडगावकरमय केला. यावेळी उपस्थित अशोक पत्की यांनीही पाडगांवकरणाचे किस्से सांगत कार्यक्रमात गोडगा निर्माण केला.

अखेर रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ” शुक्रतारा मंद वारा”, या भावस्पर्शी गीताने पाडगावकरांच्या जयंती अभिवादन कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमास अशोक पत्की, उत्तरा माने, विजया जोगळेकर तसेच मोठ्या संख्येने पाडगावकर कुटुंब उपस्थित होते.