नागरी प्रश्नांवर काँग्रेसने निवडणूकीला सामोरे जावे : ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी

171
  • ‘राजीव गांधी जयंती सप्ताहां’तर्गत व्याख्यान
पुणे : “कॉंग्रेस ही भारतीय लोकांची मानसिकता आहे. एक निवडणूक हरले म्हणून कॉंग्रेस संपली असे होणार नाही. ही बाब कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लक्षात घेतली पाहिजे. आगामी काळातील निवडणूकीचा मुद्दा हुकुमशाही विरूद्ध लोकशाही हा असणार आहे. क्रयशक्ती, सामाजिक तणाव, शहरे महाग आणि खेडी भकास या तीन विषयांवर कॉंग्रेसने निवडणूक लढवावी. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न समजून घेत त्यावर सरकारला घेरले पाहिजे,” असे मत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘२०१९ च्या निवडणुका आणि काँग्रेस व विरोधी पक्ष’ या विषयावर केसरी बोलत होते.
राजीव गांधी स्मारक समिती आणि पुणे शहर-जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने भारतरत्न स्व.राजीव गांधी जयंती सप्ताहांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हिराबाग चौकातील रंगदर्शन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हासदादा पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, कॉंग्रेस नेते बाळासाहेब शिववरकर, सोनाली मारणे, राजीव जगताप, सूर्यकांत मारणे, नंदूशेठ पापळ, विवेक भरगुडे, महेश अंबिके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
व्यंकटेश केसरी म्हणाले, “2014 च्या निवडणूकीवेळी असलेली मोदी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्‍न आहेत. रोजगार प्रश्‍नाबाबत ते बोलत नाहीत. परदेश दौऱ्याचा आढावा मोदी देत नाहीत. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही मागासवर्गीय समाजाबाबत भूमिका घेतलेली नाही. राज्यात मराठा आरक्षणासारख्या प्रश्‍नावर भाजपचे लोक निर्णायक भूमिका घेत नाहीत. यामुळे त्या समाजाच्या मनात असंतोष आहे. भाजपचे लोक त्यांना शांत करू शकतात. परंतु त्यांना एखाद्या प्रश्‍नाबाबत पटवू शकणार नाही, त्यामुळे तो मुद्दादेखील कॉंग्रेसला उपयुक्त ठरेल. या सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून कॉंग्रेसने आपली रणनिती आखावी.”
यावेळी संरक्षण मालमत्ता खरेदीविषयक मार्गदर्शन करताना अनंत बागाईतकर म्हणाले, “राफेल विमान खरेदीबाबत फ्रान्स सरकारने सुरक्षितता आणि कार्यात्मक गोपनीयता याबातचे तपशिल दिले जाऊ शकत नाही, असे सांगितले. मात्र यामध्ये विमानांच्या किमतींचा सुरक्षिततेशी फारसा संबंध नाही. त्यामुळे सुरक्षेच्या नावावर गोपनीयता बाळगणे हा भंपकपणा आहे. देशाला 126 विमानांची आवश्‍यकता असताना केवळ 36 विमाने घेण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला? फ्रान्सचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जो ‘वन टू वन’ करार झाला त्यानुसार राफेल विमानांची सध्याची किंमत 36 हजार कोटी रूपये म्हणजे आधीच्या करारापेक्षा तिपटीने जास्त आहे. एकूणच हा सर्व विमानखरेदीचा घाट हा एकांगी होता. या खरेदीमध्ये कायदेशीर प्रक्रीयांचे पालन झालेले नाही. अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेल्या माहितीमुळेच राफेल खरेदीतील पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहतात.”
अध्यक्षीय भाषण उल्हासदादा पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोपाळ तिवारी यांनी राजीव गांधी सप्ताहाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. हनुमंत पवार यांनी सूत्रसंचालन केले.