वाचन-लेखन ही सर्वात आनंददायी गोष्ट : राजन खान

107
  • नंदकुमार येवले लिखित ‘जेरुसलेम तुझ्याचसाठी’ कादंबरीचे प्रकाशन

पुणे : “चांगल्या लिखाणाची ओळख काळ आणि समाज ठरवतो. त्यामुळे सतत वाचन, लेखन केले पाहिजे. माणूस म्हणून जगताना वाचन हीच सर्वात आनंद देणारी गोष्ट आहे. वाचन-लेखन छंद नाही, तर जगण्याचा भाग असायला हवा,” असे मत ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी व्यक्त केले.

नंदकुमार येवले लिखित आणि प्रफुल्लता प्रकाशन प्रकाशित ‘जेरुसलेम तुझ्याचसाठी’ कादंबरीचे प्रकाशन राजन खान यांच्या हस्ते पत्रकारभवन येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे होते. प्रसंगी लेखक नंदकुमार येवले, प्रकाशक गुलाबराव सपकाळ आदी उपस्थित होते.

राजन खान म्हणाले, “आपल्याकडील लेखक जात, धर्म, समाज आणि स्वतःच्या जगण्याची कथा मांडण्यात रमतो. परिणामी, मराठी साहित्य जागतिक स्तरावर जात नाही. नंदकुमार येवले यांनी त्यापलीकडे जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जगभर ज्यू लोकांवर झालेल्या अन्यायाची कथा त्यांनी ‘जेरुसलेम तुझ्याचसाठी’मध्ये शब्दबद्ध केली आहे. रोजच्या जगण्याच्या धबाडग्यातून बाहेर पडून असे चांगले साहित्य आपण वाचले पाहिजे.”

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “मानवी करुणेच्या बाजूने बोलणारी ही कादंबरी आहे. अभ्यासक्रमात अशा साहित्याचा समावेश व्हावा. वाचकांच्या जोरावरच लेखक मोठा होत असतो. वाचण्यातून माणूस घडतो. वाचन संस्कृती वाढविण्याचे, पुढच्या पिढीला घडविण्याचे दायित्व आपण पार पाडायला हवे. पुस्तकांची दुकाने बंद होता कामा नये.”

पुस्तकात केलेली चिकित्सा, संशोधन आणि मांडणी सखोल असल्याचे गुलाबराव सपकाळ यांनी नमूद केले. नंदकुमार येवले यांनी पुस्तकाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. अनिरुद्ध येवले यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. गुरुनाथ साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. दीपिका येवले यांनी आभार मानले.