राज ठाकरेंनी इरादा बदलताच जुने भिडू पक्षात परत?? या दोन महत्वाच्या नेत्यांनी घेतली भेट

352

मुंबई | राज ठाकरे यांनी 2006 साली मराठी अस्मितेच्या मुद्यावर मनसेची स्थापना केली. आपल्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच 2009 च्या निवडणुकीत मनसेचे एकाच फटक्यात 13 आमदार निवडून आले. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत मनसेची अवस्था काहीशी बिकट झाल्यानंतर मनसेने आपले इरादे बदलण्याचे संकेत दिले आहेत. हे बदलाचे संकेत मिळताच मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरे भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरेंची भेट ही महत्वाची मानली जात आहे.

तसेच महाअधिवेशनापूर्वी हर्षवर्धन जाधव पुन्हा घरवापसी करणार का? अशाही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हर्षवर्धन जाधव हे कृष्णकुंजवर पोहचताच काही वेळातच भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन हे देखील राज यांच्या भेटीला पोहचले. प्रकाश महाजन आता नेमकी काय राजकीय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं आहे.

दरम्यान, 23 जानेवारी रोजी मनसेचं महाअधिवेशन पार पडत आहे. 23 तारखेला राज ठाकरे काही महत्वाच्या घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे सोडून गेलेले नेते पुन्हा मनसेत परतणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.