उद्या भारत ‘बंद’, : BANK, ATM ला बसू शकतो फटका

134

देशातल्या मोठ्या कामगार संघटनांनी उद्या (8 जानेवारी) देशव्यापी ‘बंद’ची हाक दिली आहे. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रावर परिणाम होईल. बँक कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता असल्याने ATM मधले पैसे संपेपर्यंतच ती सुरू राहणार आहे.

देशातल्या 10 मोठ्या कामगार संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली आहे. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे. जनतेविरोधातल्या धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद करत आहोत, असं या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC या आणि इतर स्थानिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. एअर इंडिया विकण्याची अगोदरपासूनच चर्चा आहे. रेल्वेचंही खासगीकरण करण्याच्या तयारीत सरकार आहे. BSNL-MTNL विलीनीकरण झाल्याने 93600 कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. या खासगीकरण धोरणाविरोधात उद्याचा बंद आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. सेंट्रल ट्रेड युनियन – सीटूच्या (CITU) वतीने पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे.

कर्माचाऱ्यांच्या 12 विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभारातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढणार असल्यामुळे हा संप करत असल्याचं कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले.

2 जानेवारीला झालेल्या बैठकीत सरकारतर्फे कामगारांना कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्याने कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली. या बंदमध्ये देशभरातल्या काही महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनांनीही सहभागी व्हायचं ठरवलं आहे. JNU मध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ते बंदमध्ये सहभागी होणार आहेत.