जितेंद्र आव्हाड तुम्ही आता मंत्री झालाय, जरा तोंड सांभाळून बोलत चला ;आशिष शेलार

380

जितेंद्र आव्हाड एक जबाबदार कॅबिनेट मंत्री झाले आहेत. तेव्हा आता केवळ आमदार असल्यासारखं वागू नका आणि या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यावर बोलताना सांभाळून बोला अशी ताकीद आम्ही त्यांना देतोय’ असं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे नवे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सुनावले आहे. त्याचबरोबर ‘ते आता गृहनिर्माण मंत्री नसून गृह-कलह मंत्री झालेत’, असा घणाघातही आशिष शेलार यांनी केला.

जेएनयू येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात पडले. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करुन या घटनेचा विरोध केला. या आंदोलनात नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. या आंदोलना दरम्यान प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आव्हाड म्हणाले होते की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता जवाहरलाल नेहरु विद्यालयातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर दिल्लीत कुणाचे पोलीस आहेत? असा सवाल करत आव्हाड यांनी केंद्र सरकारला दोषी ठरवलं होतं.याच टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) येथे रविवारी रात्री झालेल्या हिंसाचारावरुन महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे.