काँग्रेसला सोडून शिवसेनेनं हाती घेतलं कमळ, या जिल्ह्यात दिला भाजपला पाठिंबा

151

राज्याच्या राजकारणात सत्तेच्या समीकरणाचा नवा फॉर्मुला महाविकास आघाडीच्या माध्यमातून समोर आला आणि त्यानंतर लातूरची महानगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली. या सत्ताबदलाचा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, भाजपनं आपली जिल्हा परिषदेवरची पकड कायम ठेवत पुन्हा सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेनंदेखील भाजपला पाठिंबा देत भाजपसोबत राहण्यातच धन्यता मानली आहे. भाजपनेसुद्धा यावेळी युवा नेतृत्वाला संधी देत राहुल केंद्रे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.

विधानसभा निवडणुकीत आलेलं अपयश आणि सत्तेसाठी राज्यात झालेली फरफट पाहता या निवडणुकीला महत्व देऊन भाजपनं दोन दिवस आधीपासूनच जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना एका रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. राजकारण आणि भाजपच्या गटा-तटामुळं पडलेली फूट यामुळे नुकसान होऊ नये यासाठी भाजपनं हवी ती खबरदारी घेतली होती. त्यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोधच पार पडली. सेनेचा एकमेव सदस्य सोबत आल्याने अजूनही भाजप सेनेची मैत्री कायम असल्याचं नवनियुक्त अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितलं.

पाहुयात लातूर जिल्हापरिषदेत कोणत्या पक्षाचे किती आहे संख्याबळ

भाजप – 35

शिवसेना – 01

काँग्रेस – 14

राष्ट्रवादी – 05

अपक्ष – 02