मनसे आता ‘रंग’ बदलणार?

265

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाची राजकीय कोंडी करूनही यश मिळत नसल्यामुळे निवडणूक चिन्ह इंजिनची दिशा बदलणारा मनसे आता आपल्या झेंड्याचा रंग बदलणार आहे, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. केशरी, निळा, हिरवा आणि पांढर्‍या रंगांचा मनसेचा ध्वज आहे. या ध्वजामध्ये इतर रंगांच्या तुलनेने मनसे आता केशरी रंगाला जादा जागा मिळणार आहे.

मनसेच्या एका नेत्याने पक्षाचा नवीन झेंडा निश्चित होत असल्याला दुजोरा दिला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनापर्यंत म्हणजे 23 जानेवारीपर्यंत त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी भाजपा आणि शिवसेनेला निशाणा केले होते. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली होती. काँग्रेस आघाडीपेक्षा राज यांच्या सभांचीच राज्यात चर्चा झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज पुन्हा मैदान मारणार असे चित्र होते. मात्र, प्रचारसभांच्या गर्दीचे मनसेच्या मतांमध्ये परिवर्तन झाले नाही. मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला.

शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. त्यामुळे सेनेला पूर्वीप्रमाणे हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार लावता येणार नाही. हे ओळखून मनसे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणणार आहे. त्यासाठी मनसेने आपल्या झेंड्यामध्ये भगव्या रंगाला जादा प्राधान्य दिल्याचे बोलले जाते.