मनसे-भाजपची युती? राज ठाकरे आणि मोदी एकाच बॅनरवर

280

मुंबई – राजकारणात कधीच कुणीही कोणाचा शत्रू नसतो असे वाक्य नेहमीच म्हंटले जाते. या वाक्याची प्रचितीही मागील दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राला आली आहे. असेच एक अनपेक्षित युती आता पालघरमध्ये सध्या दिसून येत आहे. भाजपचे कडवे विरोधक मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राज ठाकरे यांनी २०१४ मधील निवडणुकीत नरेंद्र मोदींना समर्थन दिले होते.

मात्र आगामी काळात त्यांनी आपली भूमिका बदलत लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी-शहांवर आक्रमकपणे टीका केली. परंतु, सध्या पालघर मधील वाडा तालुक्यात मोदी आणि राज ठाकरे एकाच बॅनरवर दिसून आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे.

पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. ७ जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. मात्र, वाडा पंचायत समितीसाठी भाजप आणि मनसे यांची युती असल्याने मोदी आणि राज ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो लागले आहेत. तर ही युती नसून गाव पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समजुतीने झालेला तोडगा आहे, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. तसेच हे बॅनर्स मनसेने नव्हे, तर भाजपने लावल्याचा आरोपही त्यांनी केला.