‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर आपला जलवा दाखवत आहेत वहिनीसाहेब

162

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील वहिनीसाहेब, म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगांवकर सध्या ‘युवा डान्सिंग क्वीन’ या ‘झी युवा’वरील स्पर्धेत सहभागी झालेली आहे. ही गुणी अभिनेत्री आपल्या नृत्याच्या अदांनी सगळ्यांच्या मनावर छाप पाडत आहे. यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा;

१. ‘युवा डान्सिंग क्वीन’मध्ये तू तुझं पहिलं नृत्य कुठल्या गाण्यावर सादर केलंस?

‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया’ या गाण्यावर मी स्पर्धेतील माझं पहिलं नृत्य केलं. हे नृत्य दीपनृत्य या प्रकारातील होतं.

२. किती वेळानंतर तू स्टेजवर सादरीकरण केलंस? पुन्हा एकदा स्टेजवर नृत्य सादर करायचं म्हणून मनात काही उत्सुकता होती का?

मी दरवर्षी ‘झी’च्या अवॉर्ड शोजमध्ये नृत्य सादरीकरण करते. अर्थात, स्पर्धात्मक पातळीवर म्हणाल, तर जवळपास १२ वर्षांनी मी मंचावर उतरणार आहे. कॉलेजमध्ये असताना मी स्पर्धेत सहभागी झाले होते. मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मी स्पर्धक म्हणून मंचावर उतरणार आहे.

३. ‘युवा डान्सिंग क्वीनमधील तुझा जास्त आवडता परीक्षक कोण आहे?

दोघांपैकी कुणाला एकाला ‘आवडता’ म्हणून निवडणं खरंतर कठीण आहे. दोघेही माझे आवडते परीक्षक आहेत. सोनाली मॅम आमच्या सादरीकरणाच्या बाबतीत फारच काटेकोर आहेत. मयूर दादा खूपच प्रेमळ आहे. त्याने दिलेल्या टिप्सचा नेहमीच फायदा होतो.

४. तुझा सर्वाधिक आवडता डान्सर कोण?

अर्थातच, माधुरी दीक्षित.

५. तुला ‘स्टेज फिअर’ आहे का?

मंचावर सादरीकरणासाठी उतरायचं असेल, तर पोटात गोळा येणं आणि अंगावर शहारे येणं या गोष्टी आजही माझ्या बाबतीत होतात. याला मी ‘स्टेज फिअर’च म्हणेन.