दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

190

आक्षेपार्ह प्रसंग न वगळल्यास ‘दबंग ३’ वर बहिष्कार ! – धर्मप्रेमी हिंदूंची चेतावणी

पुणे | डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या ‘दबंग ३’ या हिंदी चित्रपटात साधूंना गॉगल घालून आणि हातात गिटार घेऊन आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. तसेच देवतांचाही अवमान करण्यात आला आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतरही नाचणारे साधू खोटे असल्याचे सांगत सलमान खान यांनी चित्रपटातील सदर दृश्याचे समर्थन केले आहे. असे असेल तर सलमान खान यांनी खोटे मुल्ला-मौलवी आणि फादर-बिशप यांना गिटार घेऊन आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले असते का ? हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे असे विडंबन आम्ही कदापि सहन करणार नाही. चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला नाही, तर ‘दबंग ३’ वर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी दिली. त्या १४ डिसेंबर या दिवशी टिळक चौक(अलका टॉकीज जवळ) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र्रीय हिंदू आंदोलना’त बोलत होते. या वेळी ‘धार्मिक तेढ निर्माण करणारा दबंग ३ बंद करा’, ‘हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या सलमान खान याचा धिक्कार असो’, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. सेन्सॉर बोर्डाने दबंग ३ चित्रपटातून होणारे हिंदूंच्या श्रद्धास्थांनाचे, तसेच भारतीय संस्कृतीचे विडंबन करणारे प्रसंग तात्काळ काढावेत, अन्यथा चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनाला अधिवक्ता सत्येंद्र मुळे, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, अधिवक्ता निलेश निढाळकर, अधिवक्ता अनिकेत पाठक, राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे नितीन पोटे, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी अन् ६५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

आंध्रप्रदेश सरकारने जेरुसलेम आणि हज यात्रेकरूंच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय रहित करावा !

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मुसलमानांना हज यात्रेसाठी आणि ख्रिस्त्यांना जेरुसलेम यात्रेसाठी यापूर्वी ४० सहस्र रुपये मिळणारे अनुदान वाढवून ६० सहस्र रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१२ मध्ये केंद्र सरकारला हज यात्रेसाठी देत असलेले अनुदान १० वर्षांत बंद करण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आंध्रप्रदेश सरकारचा हा निर्णय म्हणजे अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश सरकारने जेरुसलेम आणि हज येथे यात्रेसाठी जाणार्‍या अनुदान देण्याचा निर्णय रहित करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी महिला अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी आणि महिलांशी संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, महिलांवरील अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवून दोषींवर शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, डॅनियल यांनी महिलांविषयी जे अपशब्द वापरले आहेत, त्यातून त्यांनी महिलांची अवहेलना आणि देशभरातील समस्त महिलांचा अपमानच केला आहे. त्यामुळे डॅनियल श्रवण यांच्यावर Indecent Representation Of Women Act आणि अन्य विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील दागिने गहाळ झाल्याच्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून संबंधितांवर योग्य ती कारवाई तात्काळ कारवाई करावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.