नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

107

मुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यातील आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी राजीनामा दिला आहे.अब्दुल रहमान यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली.

या विधेयकाबाबत देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या धार्मिक बहुलतेविरोधात असल्याचे रहमान यांनी सांगितले. सर्व न्यायप्रेमींनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राजीनाम्याचे कारणही त्यांनी सांगितले असून, नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकास विरोध दर्शवत या पदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचे पत्रक सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी संध्याकाळी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद मणिपूर, आसाममध्ये दिसण्यास सुरुवात झाली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. सध्या तिथली परिस्थिती बिघडली असून तणावाचं वातावरण आहे.

: