आक्षेपार्ह प्रसंग न वगळल्यास दबंग 3 वर बहिष्कार !

130

मुंबई | 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या दबंग 3 या हिंदी चित्रपटात साधूंना गॉगल घालून व हातात गिटार घेऊन हिडिस अन् आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. देवतांचाही अवमान करण्यात आला आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतरही नाचणारे साधू खोटे असल्याचे सांगत सलमान खान यांनी चित्रपटातील सदर दृश्याचे समर्थन केले आहे. असे असेल तर सलमान खान यांनी खोटे मुल्ला-मौलवी आणि फादर-बिशप यांना गिटार घेऊन आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवावे ! हे जर ते करू शकणार नसतील, तर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन आम्ही कदापी सहन करणार नाही. चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला नाही, तर ‘दबंग ३’ वर बहिष्कार घालण्यात येईल, अशा इशारा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दादर येथील आंदोलनाच्या वेळी दिला.

दबंग ३ चित्रपटातून हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या विरोधात 8 डिसेंबर रोजी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांनी हा निर्णय घेतला. या आंदोलनात हिंदू राष्ट्र सेना, बजरंगदल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, वज्रदल, हिंदु जनजागृती समिती, शिवपुत्र प्रतिष्ठान, श्रीराम-गणेश मित्रमंडळ (धारावी), सनातन संस्था, रणरागिणी शाखा आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनात धार्मिक तेढ निर्माण करणारा दबंग 3 बंद करा, हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या सलमान खान याचा धिक्कार असो, अशा उत्स्फूर्त घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. हातामध्ये फलक धरून धर्माभिमानी या आंदोलनात सहभागी झाले होते. सेन्सॉर बोर्डाने दबंग ३ चित्रपटातून होणारे हिंदूंच्या श्रद्धास्थांनाचे, तसेच भारतीय संस्कृतीचे केले गेलेल्या विडंबनाचे प्रसंग तात्काळ काढून टाकावेत, तोवर चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी आंदोलनात सहभागी हिंदू धर्मप्रेमींनी केली.

धार्मिक भावना जपल्या जाव्यात म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या हिंदूंना प्रसिद्धीसाठी आंदोलन चालू आहे, असे म्हणणार्‍या सलमान खान यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. हिंदूंनी संपूर्ण चित्रपटाला विरोध केलेला नाही. तर धार्मिक भावना दुखवणारा आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी केली आहे; मात्र हिंदूंना भावनांची अशी अवहेलना जर सलमान खान करणार असतील, तर समस्त हिंदूंना या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी सांगितले.