नात्यातील वास्तविकता दाखवणारा ‘सिनियर सिटीझन’

229

अतिशय वास्तववादी आणि विचार करायला लावणारे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.  दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी आजच्या भेसूर परिस्थितीचे वास्तववादी वर्णन या चित्रपटात केले आहे. पिढ्यानपिढ्या देशसेवेचे व्रत आचरणात आणणाऱ्या देशपांडेंच्या घरात चित्रपटाची कथा घडते. निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे आपल्या पत्नीसोबत निवृत्तीनंतरचे निवांत आयुष्य जगत असतानाच समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवून दोन हात करत असतात. तर दुसरीकडे आजची तरुण पिढी स्वच्छंदी आयुष्य जगण्याच्या नादात कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते याचे विदारक चित्रण या ट्रेलर मधून दिसले. अशातच एक अघटित घटना घडून या देशपांडे दाम्पत्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करते. 

या चित्रपटातून  आजची परिस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अजय फणसेकर यांनी केला आहे.  या चित्रपटातील ‘किलर’ आणि ‘रुसवे फुगवे’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.  या दोन्ही गाण्यांना अंबरीश देशपांडे यांनी शब्दबद्ध तर अभिजित नार्वेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. यातले ‘किलर’ हे गाणे दर्शना मेनन यांनी तर ‘रुसवे फुगवे गाणे विनय मांडके यांनी गायले आहे.          

माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, आशिष पवार, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी काम पहिले आहे तर एक्झिक्टिव्ह प्रोड्युसरची धुरा प्रमोद सुरेश मोहिते यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा येत्या १३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.