हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

210

चाकण येथील प्रकार | माहेराहून ५० लाख आणण्यासाठी तगादा

चाकण | तू तुझ्या आई – वडिलांकडून हुंड्यापोटी ५० लाख रुपये घेवून ये, असा तगादा लावून पत्नीस शिवीगाळ, दमदाटी, बेदम मारहाण करून उपाशीपोटी ठेवून तिला तिचे जीवन जगणे असहय्य करणाऱ्या पतीवर ( दि. ९ डिसेंबर ) येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकण येथे संबंधित विवाहिता सासरी नांदत असताना २ जून, २०१३ ते ३० नोव्हेंबर, २०१९ या सहा वर्षांच्या कालावधीत वरील प्रकार घडला.

किरण नंदू मांजरे (रा. ग्रीन इस्टेट सोसायटी, रोहकल रोड, चाकण.) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. किरण याची पत्नी सोनम किरण मांजरे (वय – २९ वर्षे, मूळ रा. ग्रीन इस्टेट सोसायटी, रोहकल रोड, चाकण, सध्या रा. कौटकरवाडी, काळूस, ता. खेड) हिने या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा वर्षापूर्वी (दि. २ जून, २०१३) सोनम हिचा किरण नंदू मांजरे याच्या बरोबर चाकण येथील स्वयंवर मंगल कार्यालयात धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. त्यानंतर सोनम ही किरण याच्या बरोबर चाकण येथे सासरी नांदण्यास गेली. पती किरण हा काही कामधंदा करत नसल्याने सोनम हिच्या आई – वडिलांनी एक एल.एन्ड.टी. कंपनीचा पोकल्यांड त्याच्या नावावर करून दिला होता. मात्र, एवढ्यावर किरण काही समाधानी नव्हता.

पत्नी सोनम हिने माहेराहून हुंड्यापोटी पोकल्यांडचे राहिलेले २८ लाख रुपये घेवून यावेत. व मारुती गाडी घेवून देण्यास सांगावे, यासाठी तो शिवीगाळ, दमदाटी व बेदम मारहाण करून तिला उपाशीपोटी ठेवू लागला. ती माहेराहून एकूण ५० लाख रुपये जोपर्यंत आणत नाही, तोपर्यंत तिला घरात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका किरण याने घेतली होती. रोजच्या होत असलेल्या या जाचाला कंटाळून सोनम हिने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादी वरून पती किरण नंदू मांजरे याच्यावर गु.र.नं. १४९२/२०१९ नुसार, भा.द.वि.कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. 

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राम राठोड, एस. आर. वाघुले व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.