विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच – विनायक मेटे

113

विधानपरिषदेत भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि अनुभवीदेखील मीच आहे. त्या अर्थाने विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे, असा दावा आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच हा सर्वस्वी निर्णय भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीचा असल्याचेही दुसरीकडे म्हटले आहे.

बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी हा दावा केला आहे. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचा याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही सांगायला विनायक मेटे विसरले नाहीत. याचप्रमाणे विधानपरिषद विरोधीपक्षनेतेपदाबद्दल बोलायचं झाल्यास हा सर्वस्वी निर्णय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांसारख्या पक्ष श्रेष्ठींचा आहे, असे ते म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर आम्ही विरोधी पक्षात आहोत. ते काम आम्ही चोखपणे बजावणार आहोत, असे देखील मेटे म्हणाले. तसेच शिवसंग्रामच्या आमदारांना घेवून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. तसेच आम्ही सर्व चवदार तळ्यावर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेवून संघर्षाला सुरुवात करणार आहे, असे ते म्हणाले.