चार नृत्यशैलींनी सजलेला ‘नृत्यसंगम’

50

पुणे : आफ्रिकन प्रोव्हर्ब, मार्शल आर्ट्स, अंगावर शहारे आणणारं संगीत… पारंपारिक मंगलचरण, गणेशस्तुती आणि त्यातूनच रसिकांच्या मनाला मोहिनी घालणाऱ्या विविध नृत्यशैलीनी रंगला ‘नृत्यसंगम’. सकल ललित कलाघर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मेघना राव व निखील परमार यांनी आफ्रिकन प्रोव्हर्ब व मार्शल आर्ट्स यांची सांगड घालताना कंटेपररी या नृत्यशैलीची प्रस्तुती केली. त्यानंतर रसिका गुमास्ते यांनी मंगलाचरण, गणेशस्तुती यावर ओडिसी नृत्यप्रस्तुती केली.

कन्नड कवी पुरंदर दास यांची रचना असलेल्या व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘भाग्यदा लक्ष्मी’ या अभंगावर धनश्री पोतदार व त्यांच्या विद्यार्थीनीनी कथकद्वारे अभिवादन केले. अरुंधती पटवर्धन व त्यांच्या विद्यार्थीनी यांनी लंकाधिपती रावणाने रचलेली ‘शिवं’ ही शिवस्तुती भरतनाट्यमच्या माध्यमातून प्रस्तुत केली. सर्वच रचनांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

या कार्यक्रमाला प्रसाद पुरंदरे, माधुरी पुरंदरे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक रसिका गुमास्ते यांनी तर अरुंधती पटवर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले.